श्रीमती प्रतिभा देविसिंह पाटील यांचा जन्म १९३४ च्या डिसेंबर महिन्यात १९ तारखेला महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नाडगांव या खेडे गावात झाला.
श्रीमती पाटील या २५ जुलै २००७ रोजी भारतीय गणराज्याच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्यात. भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी (२००४-२००७) या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या ‘राज्यपाल’ म्हणून कार्यरत होत्या.

Smt. Pratibha Patil

शिक्षण

श्रीमती प्रतिभाताईचे शालेय शिक्षण आर. आर. विद्यालय जळगाव येथे झाले. जळगाव शहरातीलच नामांकित मु. जे. महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात त्यांनी प्राविण्य मिळवले. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच ‘आमदार’ झालेल्या प्रतिभाताईंनी पुढे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून ‘विधी स्नातक’ हि पदवी संपादन केली.

व्यावसायिक कारकीर्द

श्रीमती पाटील यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सनदी वकील म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीचा आरंभ केला. त्या सोबतच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विशेषतः शोषित महिलांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिले.

राजकीय कारकीर्द

वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी विधानसभेची पहिली निवडणूक जिंकून त्या जळगाव मतदारसंघाच्या आमदार झाल्या. त्यानंतर १९८५ पर्यंत त्या सातत्याने ४ वेळा एदलाबाद (मुक्ताईनगर) मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून आल्यात. पुढे १९८५ ते १९९० पर्यंत त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्यात. त्यानंतर लगेचच त्यांनी राज्यसभा उपसभापती पदाची धुरा सांभाळली. १९९१ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्यात. श्रीमती पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचे आगळे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे त्या आपल्या अखंड राजकीय जीवनात कुठल्याही निवडणुकीत कधीही पराभूत झाल्या नाहीत.

महाराष्ट्र विधिमंडळ/ प्रशासकीय कारकीर्द

श्रीमती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत विधिमंडळ तसेच शासनस्तरावर विविध जबाबदारीची पदे भूषविलीत.

१९६२-६७ महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्वात तरुण सदस्या
१९६७-७२ उपमंत्री महाराष्ट्र शासन (गृह निर्माण, सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी, पर्यटन आणि विधिमंडळ कामकाज)
१९७२-७४ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण
१९७४-७५ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आणि सार्वजनिक आरोग्य
१९७५-७६ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, दारूबंदी, पुनर्वसन आणि सांस्कृतिक कामकाज
१९७७-७८ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, शिक्षण
१९७९-८० विरोधी पक्षनेत्या, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ
१९८२-८३ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, नगरविकास आणि गृहनिर्माण
१९८३-८५ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण आणि अन्न नागरीपुरवठा

सांसदीय कारकीर्द

महाराष्ट्रातील यशस्वी राजकीय कारकीर्दीनंतर श्रीमती पाटील देशपातळीवर संसदिय कामकाजात सक्रीय झाल्यात. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्या म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या कार्यकाळात त्यांनी सांसदीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पडल्यात. प्रामुख्याने त्यांनी २५.७.८७ ते २.९.८७ या कालावधीत राज्यसभेच्या सभापती म्हणून काम पहिले.

१९८५-१९९० राज्यसभा सदस्या
१९८६-१९८८ अध्यक्षा, राज्यसभा विशेषाधिकार समिती
१९८६-१९८८ उपसभापती, राज्यसभा
१९९१-१९९६ लोकसभा सदस्या
१९९१-१९९६ अध्यक्षा, हाउसकमिटी, लोकसभा

सार्वजनिक जीवन

आपल्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय जीवनात श्रीमती प्रतिभाताई अनेक संस्थाशी विविध भूमिकांमध्ये जुडलेल्या होत्या. त्या १९८२-१९८५ या कालावधीत महाराष्ट्राच्या पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्य केले. तसेच त्यांनी १९८८-१९९० दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद देखील भूषविले. राष्ट्रीय संघ नागरी सहकारी बँका व पतसंस्थाच्या त्या संचालक व उपाध्यक्ष असतांनाच त्यांनी राष्ट्रीय सहकारी संघाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून उत्तम कार्य केले.शिवाय महाराष्ट्र शासनाच्या २० कलमी अंमलबजावणी कार्यक्रमाच्या त्या अध्यक्षही होत्या.

श्रीमती पाटील यांनी अनेकदा विविध भूमिकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्या नैरोबी आणि पुर्तो रिको येथे समाजकल्याणाशी निगडीत आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या. १९८५ मध्ये बल्गेरिया येथे गेलेल्या आखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळात त्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या, तसेच १९८८ ला लंडन येथे कॉमनवेल्थ प्रीसायडींग ऑफिसर्सच्या परिषदेत देखील त्यांचा सहभाग होता. १९८५ मध्ये बिजिंग, चीन येथे पार पडलेल्या ‘जागतिक महिला परिषदेत’ श्रीमती प्रतिभाताईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले तसेच ऑस्ट्रिया येथील ‘महिलांचा दर्जा’ या विषयावरील परिषदेत त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्ये

आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनात श्रीमती पाटील यांनी महिलाविकास, बालकल्याण व समाजातील वंचित घटकासाठी अतोनात प्रयत्न केलेत. त्यांच्या हितासाठी श्रीमती प्रतिभाताईंनी अनेक संस्था उभारल्यात. उदा. १) मुंबई आणि दिल्ली येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे २) ग्रामीण भागातील तरुणांसाठी जळगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय ३) महिला विकासाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी त्यांनी धर्मादाय संस्था स्थापन केली. ५) जळगाव येथे त्यांनी अंध औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. V) अमरावती जिल्ह्यात भटक्या व विमुक्त जातीतील व मागासवर्गातील मुलांसाठी शाळा ४) दुर्गापूर, अमरावती येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र.

महिला विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या महिला विकास महामंडळाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट राहिलेला आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गरीब आणि गरजू महिलांसाठी श्रीमती पाटील यांनी संगीत, संगणक व शिवणकला वर्ग सुरु केले.
श्रीमती पाटील यांनी जळगाव येथे महिला होमगार्ड युनिट सुरु केले आणि १९६२ मध्ये त्या जळगाव जिल्हा होमगार्डच्या कमांडट बनल्या.

कौटुंबिक जीवन

श्रीमती प्रतिभाताईंचा १९६२ मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. देवीसिंह रामसिंह शेखावत यांच्याशी विवाह झाला. डॉ. शेखावत यांनी मुंबई येथील नामांकित हाफकिन संस्थेतून केमोथेरपी सारख्या विषयात (रसायनशास्त्रातील) संशोधन करून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. एक शिक्षणतज्ञ व सामाजिक कार्यकर्ता असणारे डॉ. शेखावत अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर बनले तसेच ते अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले व आमदार देखील झाले. श्रीमती प्रतिभाताई – डॉ शेखावत यांना दोन अपत्ये असून – मुलगी श्रीमती ज्योती राठोर आणि मुलगा श्री राजेंद्रसिंह आहेत.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »