दंगल पीडीतांना तातडीने सहाय्य

जळगांवात १९७० साली मोठा दंगा भडकला होता. ताई त्या वेळेस महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याच्या उपमंत्री होत्या. त्यांनी तातडीने जळगावकडे धाव घेतली आणि कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता त्यांनी या दंगलीत जखमी झालेल्या लोकांसाठी सातत्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. ‘कुणीही योग्य वैद्यकीय उपचाराविना राहू नये’ असा सक्त आदेश त्यानी संबंधिताना दिला. सर्वत्र कमालीचा गोंधळ माजला होता. त्यांची गाडी या दंगलग्रस्त भागातून जात असताना एक मुलगा त्यांच्या गाडीजवळ मोठमोठ्याने रडत आला. त्याने आपल्या वडिलांची तब्येत अत्यंत खराब असल्याचे सांगितले. आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचेही त्याने सांगितले. ताईंनी त्याच्या याचनेला त्वरित प्रतिसाद दिला. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाला आदेश दिले की, त्याच्या वडिलांना चांगले उपचार मिळायला हवेत. चांगले वैद्यकीय उपचार आणि ईश्‍वराची कृपा यामुळे या जीवघेण्या आजारांतून वाचले. ज्या मुलाने आपल्या वडिलांसाठी ताईंच्याकडे धाव घेतली तो आज एक ख्यातनाम सल्लागार म्हणून ओळखला जातो.

जळगावच्या दंगलीत गोळीबारांत मुलाला झालेल्या जखमांची दखल घेऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न

जळगावच्या दंगलीमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारांमध्ये एका निष्पाप मुलाला गोळी लागून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. स्थानिक डॉक्टरांच्या मते त्याची अवस्था अतिशय गंभीर होती, ताईंना ही घटना कळाल्यानंतर त्यांनी तातडीचा पाऊले उचलली; त्या मुलाला त्यांनी जळगावहून मुंबईला हलविले. त्याची चांगली वैद्यकीय देखभाल होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. तो मुलगा जगला. त्याने चांगल्या प्रकारे आपले शिक्षण पूर्ण केले. तो मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या, ऑर्थोपेडिक विभागाचा प्रमुख बनला. त्याचे नाव डॉ ए एस चंदनवाले होय. आजही डॉ चंदनवाले ताईंनी त्या वेळेस तातडीने पाऊले उचलून आपला जीव वाचविला याची आजही आठवण काढून कृतज्ञता व्यक्त करतात.

दिवाळीचा सण दुष्काळग्रस्तांच्या समवेत

एदलाबाद शहराला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. असंख्य कुटुंबांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या गावची अशी ही बिकट परिस्थिती पाहून ताईंनी दिवाळी साजरी करायची नाही असा निर्णय घेतला. मिठाई नाही, आरास नाही, फटाके नाहीत. ही दिवाळी ज्या कुटुंबाना अतोनात दु:खाचा सामना करावा लागला त्या कुटुंबाच्यासमवेत घालवायचे.  त्यांचा राग शांत करायचा, त्यांचे अश्रू पुसायचे. दिवाळीनंतर भाऊबीज असते, ती आपल्या भावा-बहिणीसोबत साजरी करायची असते. ताई या आपल्या घरांतील एकमेव बहिण होत्या, आतापर्यन्त हा सण त्या आपल्या कुटुंबासमवेत घालवायच्या. त्यांनी त्या वर्षी ना दिवाळी साजरी केली ना भाऊबीज! एदलाबादच्या आपल्या दु:खी भावंडाच्यासमवेत त्यांचे दु:ख कमी करण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

बडनेराच्या ‘विजय टेक्स्टाईल मिल’च्या कामगारांना परत नोकरीत घेण्यास मदत

बडनेरामध्ये ‘विजय टेक्स्टाईल मिल’ होती. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, नवीन मशिनरी घेणे शक्य नसल्याने मिल मालकाने सदर मिल बंद करण्याचे ठरविले. मिलचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. १९७५ चा तो काळ होता. कामगारांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. ताई त्या वेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी होत्या. त्यांना ही बातमी कळाली. कामगारांचे हाल ऐकून खूप दु:ख झाले. त्या दरम्यान प्रधानमंत्री इंदिरा गांधी या नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमांस मुख्य पाहुण्या म्हणून येणार होत्या. या कार्यक्रमानंतर पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था होती. त्याप्रसंगी इंदिराजींच्या लक्षात आले की, ताई यांनी जेवणासाठी प्लेट घेतली नाही. त्यांनी विचारले ‘काय झाले , जेवण का घेत नाहीस? ताईंनी ठामपणे उत्तर दिले, बडनेरातील कामगारांना एक वेळचे जेवणही मिळत नाही आणि मी जेवण करणे ; मला अपराधी वाटते! इंदिरांजीनी बडनेरा येथे नेमके काय घडले हे जाणून घेतले. ताईंनी त्यांना बडनेरातील विजय मिलच्या कामगारांच्या दयनीय अवस्थेसंबंधी सविस्तर हकिकत सांगितली. नागपूर विद्यापीठाच्या त्या कार्यक्रमाला केंद्र सरकारमधील औद्योगिक विकास मंत्री डॉ सुब्रमनियम हे देखील हजर होते. त्यांनी सहानुभूतीपूर्वक या प्रश्‍नाकडे लक्ष दिल्यांस हा प्रश्‍न समाधानकारकरीत्या सुटू शकेल असा विश्‍वासही व्यक्त केला. इंदिराजीनी ताईंचा हात पकडला आणि त्यांना सुब्रमनियम यांच्यासमोर नेले. त्यांनी ही सर्व हकिकत सविस्तरपणे त्यांना सांगितली आणि त्यांचा प्रश्‍न समाधानकारकरीत्या सोडविण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे जी मिल मृतावस्थेत गेली होती आणि ‘आजारी’म्हणून गणली गेली होती त्या मिलला पुनर्जीवन मिळाले. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने मिल ताब्यात घेतली. कामगारांना नोकरीत परत घेण्यात आले. त्यांचा रोजगार सुरू झाला आणि चेहर्‍यांवरचे हास्यही!

अचलपूर टेक्स्टाईल मिलच्या कामगारांना रोजगार मिळवून देण्यात पुढाकार

अचलपूर टेक्स्टाईल मिल बंद करण्याच्या मालकांच्या निर्णयाने कामगारांना बेकारीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ताईंना ही वार्ता कळाल्यानंतर खूप दु:ख झाले. त्यावेळेस त्या खासदारपदी होत्या. त्यांनी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनशी आणि संबंधित मंत्र्यांशी त्वरित संपर्क साधला आणि मिलचे पुनर्रुजीवित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली. पण त्याला यश मिळाले नाही. मिलच्या कामगारांच्या रोजगाराची संधी हिरावली जाते याचे त्यांना तीव्र दु:ख झाले. त्या राष्ट्ाध्यक्ष बनल्या आणि त्यांनी या मिलच्या पुनर्रुजीवितासाठी पाऊले उचलली. आता ही मिल फिनले ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे.

वंचितांना आर्थिक मदतीचा हात

१९७३ साली महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. विशेषकरून विदर्भाला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. त्यावेळी ताई या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी होत्या. आपल्या मतदारसंघाची पाहणी करून त्या मुंबईला परत जात होत्या. मनमाडच्या विश्राम गृहामध्ये त्यांचा मुक्काम होता. मनमाड हे त्या काळांत एक छोटेसे गावही नव्हते, अथवा खेडेगांव म्हणावे अशीही परिस्थिती नव्हती. ताई त्या ठिकाणी आल्याचे कळताच त्यांना भेटण्यासाठी ३० स्त्रीया आल्या आणि ताईंची भेट घडवून देण्याची विनंती तिथे उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना करू लागल्या. ताईंकडे या आकस्मिक भेटीसाठी वेळही नव्हता. त्यांना इतर खूप कामे होती. तरीही त्यांनी त्यांची भेट घेतली. त्या महिलांपैकी एक तीव्र स्वरांत मोठमोठ्याने बोलू लागली ‘आमचे मनमाड हे खेडं नाही, त्यामुळे दुष्काळ निधी आम्हाला मिळेल. आम्ही मजूर म्हणून काम करायला तयार आहोत, पण हे शहर नाही की, जेथे तुम्हाला हमखास काम मिळेल. आम्हाला केंद्र अथवा राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त योजनांचा लाभही मिळत नाही. तुम्ही आम्हा स्त्रीयांसाठी काहीतरी करायला हवे. आम्ही खूप आर्थिक विवंचणेत आहोत.’
त्या बायकांच्या गार्‍हाण्यामुळे ताईंनी महिलांसाठी ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ स्थापण्याची प्रेरणा मिळाली. अशा महामंडळामुळे मनमाडसारख्या दुर्लक्षित क्षेत्रात असलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे विवंचनेत असणार्‍याना वित्तीय सहाय्याची कवाडे उघडली गेली. या महामंडळाच्या स्थापनेचा मार्ग काही सुकर नव्हता. त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, विधानसभेत अनेक प्रश्‍न विचारले गेले. त्याना समाधानकारक अशी उत्तरे द्यावी लागली. तत्कालिन मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांनी अनुकूलता दर्शविली. त्यांनी या संदर्भात वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका उपसमितीची स्थापना केली.ताई या समितीच्या सक्रिय सभासद होत्या. या प्रश्नांवर सांगोपांग दीर्घ अशी चर्चा झाली. शेवटी ‘महिला आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना झाली. महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी झाला आता इतर राज्यानीही त्याचे अनुकरण केले. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कल्याणकारी योजना मागासवर्गीय जाती-जमातीसाठीही त्यांनी राबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दूरदृष्यीमुळे महाराष्ट्रांत महात्मा फुले महामंडळ आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना झाल्यामुळे यापूर्वी हलक्या प्रकारची कामे करणार्‍या मंडळीना योग्य असे आर्थिक सहाय्य या महामंडळातर्फे मिळू लागले.

अंधांसाठी जळगांवात स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची घोषणा

ताई महाराष्ट्राच्या सामाजिक कल्याण मंत्रीपदी असताना त्यांचा दृष्टीदोष आणि अंधजणांशी संबंध येत असत. त्यांना त्यांच्या प्रश्‍नाबाबत ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ या संघटनेच्या अधिवेशनांत भाषण देण्याचा वारंवार योग येत असे. प्रत्येक बैठकीनंतर/अधिवेशनानंतर त्याच्याशी चर्चा केल्यानतर त्यांना मिळणारे अनुभव, त्यांच्या वेदना, शिकण्याची उर्मी आदि ऐकून त्या काही काळ विचलीत होऊन जात.  जळगाव येथे त्यांच्यासाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आणि एक मोठी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान त्यांना लाभले.

ज्येष्ठ गरीब स्त्रीला मायेची शाल पांघरली

ताई एकदा आपल्या पक्ष कार्यकर्त्यासमवेत अमरावतीहून जळगावला चालल्या होत्या. जीवघेणी थंडीचे ते दिवस होते. रेल्वे पुलांवर फाटक्या वस्त्रांत असलेली एक गरीब म्हातारी स्त्री थंडीत कुडकुडत होती. ताईंच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यानी तिकडे दुर्लक्ष केले आणि ते तसेच पुढे चालत गेले. तिची ती केविलवाणी अवस्था पाहून ताई थांबल्या. तिच्यापाशी गेल्या. आपल्या अंगावरची शाल त्या स्त्रीच्या अंगावर पांघरली आणि कार्यकर्त्यांसमवेत पुढे निघाल्या.

घराच्या छपरांसाठी पत्रे उपलब्ध करून दिले आणि व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्ति केंद्रात दाखल केले

ताई १९७२ साली तिसर्‍यांदा विधानसभेच्या निवडणूकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांमुळे आणि मतदारांच्या जवळिकीमुळे त्या निवडून येणार याची १०० टक्के खात्री होती. दारिद्र रेषेखालील गरिबांना त्यानी चांगल्या प्रकारच्या वीट बांधकामाची आणि पत्र्याचे छप्पर असलेली घरे दिली होती.अशाच एका घरांत राहणार्‍या व्यक्तिला काही लोकांनी भरीला टाकून या निवडणूकीत ताईंच्या विरोधी उभे केले होते. निवडणूकीच्या प्रक्रिये अगोदर एक गरीब स्त्री ताईंच्या भेटीस आली. तिने सांगितले की, आपला नवर्‍याने दारूच्या नशेत आणि काहीजणांनी भडकावल्यांने घराचे पत्रे विकून निवडणूकीसाठी लागणारी अमानत रक्कम भरली होती. त्या बिचारीला आता छपपराविना राहावे लागत होते. त्याहीपेक्षा तो ताईंसारख्या प्रामाणिक व्यक्तिच्या विरुध्द उभा होता याचे तिला अधिक दु:ख होते. ती सारखी ओक्साबोक्सी रडत होती. ताईंना ती वारंवार विनंती करत होती की, त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करा अन्यथा तो संपूर्ण मिळकत फुकून टाकेल. ताईंना तिच्या वेदना जाणवल्या. त्यांनी त्याची उमेदवारी रद्द करण्याच्या विनंतीला नकार दिला कारण असे करणे हे नैतिकतेला धरून होणार नाही. ताईनी निवडणूक जिंकली. त्या बाईचे दु:ख मात्र त्या विसरल्या नव्हत्या. तिच्या नवर्‍याची व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. संबंधित उपजिल्हाधिकार्‍याना सांगून त्या बाईच्या घराच्या छपराला पत्रे मिळवून देण्याची व्यवस्था केली. पुणे आणि दिल्ली येथील व्यसनमुक्ती केंद्रात अशा अनेक व्यसनाधीन व्यक्तिना त्यांच्या कुटुंबियाच्या विनंतीनुसार दाखल करण्याची व्यवस्था केली.

वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहून विधी पार पाडण्यासाठी पॅरोलवर मुक्त करण्यासाठी मदत

कुसुमताई सोनालकर (काँग्रेस पक्ष कार्यकर्त्या) यांचा मुलगा शेखर याने इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणिबाणीला जाहीर विरोध केला होता. त्यामुळे त्याला अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली (मिसा) अटक झाली होती. दुर्दैवाने कुसुमताईंच्या पतीचे अनपेक्षितपणे निधन झाले. शेखर त्यावेळेस नाशिकच्या तुरुंगात होता. ताई त्या वेळेस सार्वजनिक आरोग्य आणि समाज कल्याण खात्याच्या मंत्रीपदी होत्या. ताईंनी प्रसंगाचे गांभीर्य जाणून शेखरला वडिलांच्या अंत्यविधीसाठी आणि इतर धार्मिक विधीसाठी हजर राहता यावे यासाठी संबंधितांच्याकडे शब्द टाकला. शेखरची त्यामुळे पॅरोलवर मुक्तता झाली. तो अंत्यविधीच्या आणि इतर धार्मिक विधीसाठी उपस्थित राहू शकला.

डॉक्टर स्त्रीची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणार्‍या जाचापासून मुक्तता

ताई या महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्यांमध्ये उपमंत्री होत्या तेव्हा त्यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्रामध्ये स्त्री डॉक्टरच त्या केन्द्राच्या प्रमुख असतील त्याची दक्षता घेतली. ग्रामीण भागांतील स्त्रीया यांना पुरुष डॉक्टरांच्याकडून तपासून घेण्यास संकोच वाटत असे. अशाच एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्री डॉक्टरची नियुक्ती झाली. तिच्या निष्ठेने काम करण्याच्या वृत्तीबाबत आसपासच्या सर्व भागातून तिचे कौतुक होत असे. एकदा ती ताईंच्याकडे तिला एका वरिष्ठ डॉक्टरांच्याकडून होणार्‍या जाचाबद्दल तक्रार केली. ताईनी याबद्दल सविस्तर चौकशी केली आणि त्या तक्रारीची सत्यता पटल्यानंतर मुख्यमंत्र्याना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी संबंधित खात्याला तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिले आणि सदर स्त्री डॉक्टरची होणार्‍या जाचापासून मुक्तता झाली.

स्त्रीयांचा सन्मान राखण्यासाठी लोकसभेच्या शून्य प्रहरांत आवाज उठविला

समाजांने स्त्रीयांची प्रतिष्ठा राखावी, त्यांच्याबाबत कुठल्यांही प्रकारचे गैरप्रकार समाजांने होऊ दिले जाऊ नयेत. चित्रपटांत आणि जाहिरांतीमध्ये अश्‍लील चित्रण टाळावे याबाबत ताईंनी लोकसभेत १९९५ साली आवाज उठविला. त्यांनी संसदेतील सर्व स्त्री खासदारांना अशा विकृत विचारसरणीविरुध्द आवाज उठविण्यासाठी एकत्र केले आणि तेही राजकीय पक्षविरहीत संघटना बांधून – केवळ स्त्रीयांचे विकृत चित्रण प्रसारमाध्यमांमध्ये दाखविण्याला प्रतिबंध करण्यासाठी! सर्वांना एकत्र करून त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती मा. शंकर दयाळ शर्मा यांना एक निवेदन दिले. हे निवेदन माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना शिफारसीसह पाठविण्यात आले. सर्व स्त्री खासदारांनी ताईंना आग्रह केला आणि ८ मार्च १९९५ आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने त्यांनी शून्य प्रहरांत या विषयांवर आवाज उठविला. त्यांच्या भाषणाला सर्व स्तरांत चांगला प्रतिसाद मिळाला.

विधवांना तातडीची मदत

ताईंचे सर्वात महत्त्वाचे योगदान हे त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल असताना सैनिकांच्या विधवांसाठी केलेले काम होय. त्यांना त्यांच्या कामासाठी शासकीय खात्यांकडून होणार्‍या दिरंगाईबद्दल संबंधित खात्यांना त्याचे त्वरित आणि समाधानकारक निवारण करण्यास फर्माविले. राजस्थानच्या विविध जिल्ह्यांत राहणार्‍या १२०० सैनिकांच्या विधवांना त्यांनी व्यक्तिगत पत्रे लिहिली. त्यांना काही अडचणी आहेत का? याची माहिती विचारली. त्यांच्याकडे आलेल्या जवळजवळ ४०० तक्रारींचे निवारण केले. त्यांच्या अडचणींचे निवारण होत आहे किंवा कसे यासाठी पिच्छा पुरविला. त्यांच्या पुनर्वसनासाठी जयपूर येथे वसतीगृह हेाते पण कार्यरत नव्हते. ते वसतीगृह पुन्हा सुरू केले.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »