वंचित आणि दुर्लक्षितांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल

कानपूर जिल्ह्यातील श्रुती आणि गौर भाटिया या जुळया बहिणींना अनुवंशिक अशा हाडाच्या आजाराने ग्रासले होते. अशा आजारपणातही त्यांची कल्पकता आणि निर्मितीक्षमता वाखाणण्याजोगी होती. त्यांचा २००७ साली राष्ट्रीय पातळीवर ‘बाल श्री गौरव पारितोषिक’ देऊन तार्इंच्या हस्ते गौरव केला गेला. आजारी असूनही त्यांच्या उत्साही आणि दुर्दम्य आशावादाने ताई भारावून गेल्या. आपल्या कानपूरच्या भेटीत त्यांनी या मुलींची त्यांच्या पालकांसमवेत भेट घेतली. पालकांनी आपल्या मुलींच्या औषधोपचाराचा खर्च आपल्या आवाक्याबाहेर जात असल्याचे या प्रसंगी सांगितले. ताईंनी मुलींच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत देण्यासाठी राज्य सरकारला निर्देश दिले. त्याची कार्यवाही होईल याची दक्षताही घेतल्याने मुलींना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा मिळाली .

Pratibha Patil Information
Smt. Pratibha Patil

ग्रामीण भागातील कौशल्याला प्राधान्य

छत्तीसगड राज्यातील दुर्गम ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेणारी पिंकी ही टाकाऊ वस्तूंपासून चांगल्या वस्तू तयार करण्याच्या कामात कुशल होती. तिच्या या कल्पकतेच्या कामातून होणाऱ्या उत्तम निर्मितीने ताईंना प्रभावित केले होते. मार्च २००९ मध्ये राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या’ कार्यक्रमात पिंकीला – तिने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आवर्जून निमंत्रित केले गेले. तार्इंच्या या प्रोत्साहनामुळे पिंकी ही अनेक बचत गटांना अशा वस्तू तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणारी खास प्रशिक्षक बनली. राष्ट्रपती भवनातील तार्इंची भेट पिंकीच्या आयुष्याला उत्तम कलाटणी देणारी ठरली.

वंचित आणि अनाथ मुलांच्या समवेत भोजन

राजधानीत अनेक संस्था भिकारी व रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ आणि गरीब मुलांच्या कल्याणार्थ काम करत आहेत . अशा संस्थांतील मुलांना त्यांनी राष्ट्रपती भवनावर भोजनासाठी निमंत्रित केले . त्यांच्याबरोबर सहभोजन घेतले. त्यांच्याशी बातचीत करून त्यांना आलेले अनुभव आणि भविष्यकाळातील त्यांच्या महत्त्वाकांक्षा जाणून घेताना, त्यांनी अधिकाधिक शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे . त्यांच्या हाती देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे आवर्जून सांगितले . त्यांना राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डनची सहल घडवून आणली . त्या मुलांची विशेष काळजी घेतली जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले.

Smt. Pratibha Patil Hosted Lunch for Underprivileged Children and Orphans
Pratibha Patil

पुरूलियाच्या धाडसी मुली

पश्चिम बंगालमधील पुरूलिया जिल्ह्यात वन्य जमातीचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जमातीतील बाल विवाहाच्या प्रथेविरुध्द तेथील मुलींनी आवाज उठविला. त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. प्रतिभाताईंना ही बातमी समजताच त्यांनी या मुलींना राष्ट्रपती भवनावर निमंत्रित केले. रेखा कालिंदी, अफसाना खातून, सुनिता महाला या मुली आपल्या पालकांसमवेत आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर तार्इंना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनावर आल्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि अनेक अडचणी असूनही त्यांच्या शिक्षणाच्या ओढीबाबत तार्इंनी त्यांचे मनमोकळेपणाने कौतुक केले. त्या मुली आपल्या या कार्याबद्दल आदर्श ठरल्या.व त्यांना या संदेशाच्या अग्रदूत म्हणून काम करा असे तार्इंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे या मुलींनी आपले शिक्षण पुढे चालू ठेवले, इतकेच नव्हे तर आपल्या जमातीतील इतर अनेक मुलींना प्रोत्साहित केले. अशा काही मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात राष्ट्रपती भवनावर येण्याची संधीही दिली गेली.

रोशनी देवी : कोथल खुर्दच्या सरपंच

हरियाना राज्यातील महेन्द्रगड जिल्ह्यातील कोथल खुर्द या खेडेगावातील रोशनी देवी या महिला सरपंचाने आपल्या धाडसी वृत्तीचा प्रत्यय आणून दिला. ग्रामपंचायतीच्या सदस्या आणि गावातील महिलांना प्रेरित करून गावात दारूबंदी घडवून आणण्यासाठी प्रेरित केले. वाईट सवयींपासून दूर राहा आणि व्यसनाधीन होऊन आपल्या पैशाची नासाडी करू नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी गावातील लोकांना वेळोवेळी दिला. आसपासच्या अनेक स्वयंसेवी गटानी त्यांच्या या मोहिमेत स्वयंस्फूर्तरीत्या भाग घेतला. त्यांच्या चळवळीने व्यापक रूप धारण केले. परिणामी राज्य सरकारने त्या गावातील दारूचे दुकान बंद केले. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाचे नुकसान होते याबाबत तार्इंचे ठाम मत होते. रोशनीदेवीने दारूचे दुकान बंद करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची त्यांना माहिती कळाली. तार्इंनी रोशनीदेवी आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याना राष्ट्रपती भवनावर निमंत्रित केले. त्यांच्या केलेल्या कामाचे मोकळेपणाने कौतुक केले. राष्ट्रपती भवनामध्ये तिला या कामसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ११ जुलै २००९ मध्ये त्यांचा यथोचित सत्कार केला व भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने रोशनी देवीने दारूबंदी होण्यासाठी दिलेला लढ्यावर लघुपट तयार केला.

Smt. Pratibha Patil
Pratibha Patil

परोपकारी कान्तासिंग :

चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी असे सर्वसाधारण मत आहे. कान्तासिंग याने आपल्या समाजसेवेची सुरुवात अशाच परोपकारी वृत्तीने केली आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तो झारखंड राज्यातील पूर्व सिंगभूम जिल्हयाचा रहिवासी आहे. हा मागास जिल्हा समजला जातो. कान्तासिंग व्यवसायाने मेकॅनिक आहे. गरीब आणि अनाथ मुला-मुलींसाठी त्याने आपल्या घरात अनाथालय सुरू केले आहे. त्याचे उत्पन्न अतिशय कमी असल्याने त्याचा हा उपक्रम चालू राहण्यासाठी गावातले लोकही आपल्या परीने मदत करत असतात. तार्इंना त्याचा हा परोपकारी उपक्रमाची माहिती मिळाल्यावर त्या हेलावून गेल्या. त्यांनी त्याला आणि त्याच्या अनाथालयातील मुलांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले. त्यांच्याशी बातचीत करून त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांच्याबरोबर सहभोजन केले व राज्य शासनास त्याची मदत करण्यासंबंधी कळविले.

तरुण परोपकारी सर्जना :

पश्चिम बंगालला २००९ साली ‘आयला’ नामक तीव्र चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. वादळामुळे झालेली प्रचंड वाताहतीमुळे कोलकत्याची तरुण सर्जना खूप हेलावून गेली होती. वादळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण हातभार लावावा या सद्‌हेतूने तिने रेल्वे प्लॅटफॉर्मवर, रेल्वेच्या डब्यात प्रवाशांच्यासमोर नाच करून, गाणी गाऊन पैसे गोळा केले. १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने दूरदर्शनवरही आपला कार्यक्रम सादर केला. आपण जमा केलेले पैसे हे भारताच्या राष्ट्रपतींच्या हातून वादळग्रस्तांच्या मदतीसाठी जावेत ही तिची इच्छा होती. सर्जनाने पत्र लिहून तार्इंना विनंती केली. रक्कम तर अतिशय छोटी होती. तिची दुर्दम्य इच्छा पाहून ताई भारावून गेल्या. तिच्या विनंतीचा त्यांनी आभार स्वीकार केला.

Pratibha Patil Information
Smt. Pratibha Patil

चहाचा स्टॉल चालवून आपला चरिथार्थ चालविणारा लेखक

विदर्भातील लक्ष्मणराव हे १९७५ साली दिल्लीत आले. त्यांच्या खिशात त्यावेळेस केवळ रु ४० होते. चरितार्थासाठी मिळेल ती नोकरी करत हळूहळू त्यानी स्वत:चा चहाचा स्टॉल दिल्लीच्या आयकर कार्यालयाजवळ सुरू केला. आपले काम करत करत त्यांनी आपले शिक्षणही पुरे केले. त्यांनी २० कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांचे स्वत:चे जीवनही एक कथाच मानावी लागेल. त्यांनी २३ जुलै २००९ रोजी राष्ट्रपती भवनात तार्इंची भेट घेतली. तार्इंनी त्यांच्या लेखनकौशल्याचे कौतुक केले. लक्ष्मणरावांनी लिहिलेले ‘रेणू’ पुस्तक तार्इंना भेट दिले. या पुस्तकात स्त्रियांच्यावर होणारे अन्याय आणि त्यावर समर्थपणे केलेली मात याचे सार्थ वर्णन आहे. त्यांची पुस्तके आता भारतीय साहित्य कला प्रकाशनामार्फत प्रकाशित केली जातात.

स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मी इंदिरा पांडा

लक्ष्मी इंदिरा पांडा यानी आझाद हिन्द सेनेच्या राणी झाशी पलटणीत स्वातंत्र्य सैनिक म्हणून कार्यरत होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घरच्या गरिबीमुळे त्यांना घरगुती स्वरूपाची हलकी कामे करावी लागली. त्यांची देखभाल करण्यास घरचे इतर कोणीही नव्हते. एका परिचितासमवेत त्यांनी तार्इंची भेट घेतली. त्यामुळे त्यांना तत्परतेने काही आर्थिक मदत मिळाली. त्याबरोबरच केन्द्र आणि राज्य सरकार यांच्याकडे त्यांची निर्वाहवेतन मिळावे अशी शिफारसही करण्यात आली. राष्ट्रपती भवनात त्यांची भेट झाली तेव्हा इंदिरा पांडांची तब्येत खालावली होती. त्यांची त्वरित उपचाराची गरजही होती. त्यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. पांडांचे ६ ऑक्टोबर २००९ रोजी दु:खद निधन झाले. तार्इंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाबाबत गौरवाद्‌गार काढले.

Pratibha Patil- Freedom fighter Laxmi Indira Panda
Pratibha Patil

दृष्टीहीन मुलीच्या धाडसी वृत्तीचे तार्इंकडून कौतुक

मुंबईच्या ख्यातनाम अशा सेन्ट झेवियर्स कॉलेजमधून सिध्दी देसाई या मुलीने अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली होती. वयाच्या ६ व्या वर्षी तिची दृष्टी गेली होती. आपली दृष्टी गेली हा अनुभवच सिध्दीच्या दृष्टीने भयावह होता. तिच्या आईने तिचा या काळात समर्थपणे सांभाळ केला. तिला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. शालेय आणि हायस्कूलची परीक्षा सिध्दी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली. सिध्दी आणि तिची बहीण लहान असतानाच त्यांच्यावरचे वडिलांचे छत्र हरपले होते. आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईने खूप खस्ता खाल्या. तार्इंनी सिध्दीच्या जिद्दीची कहाणी समजली. त्यांनी त्याना राष्ट्रपती भवनावर निमंत्रित करून त्यांचा विश्वास वाढविला. यावेळेस सिध्दीने आपल्या अनुभवांवर लिहिलेल्या ‘व्हाय नॉट आय’ या पुस्तकाची प्रत तार्इंना भेट दिली.

मुलभूत सुविधांकरिता महिलेचा लढा

लग्नानंतर सासरी राहावयास आलेल्या अनिता नरेला आपल्या सासरी शौचालयाची व्यवस्थाच नसल्याचे कळल्याने तिने सासरी राहण्यास नकार दिला. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या सुविधेची व्यवस्था प्रत्येक घरात असावी अशी चळवळ तिने सुरू झाली. तिच्या या धाडसी वृत्तीचे आणि कणखर बाण्याचे ताईंना कौतुक वाटले. त्यांनी तिच्या नवऱ्याला, गावच्या सरपंचाला आणि सुलभ इंटरनॅशनल सोशल संघटनेच्या डॉ. बिन्देश्वर पाठक यांना २० मार्च २०१२ रोजी राष्ट्रपती भवनावर भेटीस बालविले .

आपल्या सासरी शौचालय हवे या तिच्या ठाम मागणीमुळे तिच्या नवऱ्याने हा प्रश्न पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. सुलभ इंटरनॅशनल सोशल संघटनेने ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी’ हे गाव दत्तक घेतले. पंचायतीने आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद केली, स्वच्छतागृह बांधून झाल्यानंतरच अनिता आपल्या सासरी राहायला आली.

Pratibha Patil information
Madhu Kumari from Patna

पाटण्याची मधुकुमारी :

मधुकुमारी पाटण्याची होतकरू फूटबालपटू होती. घरची गरिबी होती. घरखर्च चालविण्यासाठी तिचा मोठा भाऊ चहाची टपरी चालवित होता. मधूही किरकोळ कामे करून घर चालविण्यासाठी हातभार लावित होती. पण तिला फुटबॉल या खेळात अधिक चांगले नैपुण्य मिळवायचे होते. तार्इंना तिची ही धडपड समजली. त्या स्वत: चांगल्या खेळाडू असल्याने त्यांना तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक वाटले. तिला मदत करण्यासाठी त्यांनी बिहार राज्यात होतकरू खेळाडूंसाठी राखीव जागा निर्माण केल्या जातील यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे केवळ मधूला नव्हे तर अशा अनेक होतकरू आणि उत्तम खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. मधूला मार्च २०११ मध्ये शासकीय नोकरी मिळाली. मधूने आपल्या इतर खेळाडूंसमवेत तार्इंची आवर्जून भेट घेतली आणि आपल्याला नोकरी मिळण्याची संधी वेळीच प्राप्त करून दिल्याबद्दल आपला आनंद त्यांच्यासमोर कृतज्ञतापूर्वक नमूद केला.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष

तार्इंनी अनेकांना व्यक्तिगत तसेच समूहालाही अडचणीच्या वेळेस मदत केली आहे. याबद्दलची अनेक उदाहरणे सांगता येतील. पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील फगवाडा येथील सॅफ्रॉन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी रेल्वेमार्ग ओलांडावा लागत असे. तेथे रेल्वेचे सुरक्षा फाटक नव्हते अथवा त्याठिकाणी सुरक्षा पुरविेणारी योग्य अशी यंत्रणा नव्हती. रक्षकही नव्हता. पालकांनी तार्इंच्या सचिवालयाकडे योग्य सुरक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा केला. तार्इंनी त्याची त्वरित दखल घेऊन त्याठिकाणी सुरक्षा रक्षकासह फाटक बांधण्यासाठी योग्य ते आदेश दिले. त्याची कार्यवाही वेळेत होईल याची दक्षताही घेतली.

Pratibha Patil Information

पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील अपर्णा घोष

अपर्णाचा नवरा मंदिरात धार्मिक विधी करत असताना तेथे झालेल्या स्फोटाचा बळी ठरला. या मंदिराचे व्यवस्थापन संबंधित जिल्हा प्रशासनाकडे होते. या दु:खद घटनेमुळे अपर्णाचे जीवन उध्वस्त झाले. तिच्या सासरची आर्थिक स्थिती यथातथाच होती. तिची आणि तिच्या लहान मुलाची देखभाल करण्यास ते असमर्थ होते. नाईलाजाने तिला आपल्या माहेरी राहायला यावे लागले. तिचे वडीलही निवृत्त झाले होते. त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालत होता. आपल्या एकुलत्या एक मुलीला न्याय मिळावा -रोजगार मिळावा यासाठी त्यानी १३ वर्षे धडपड केली. तार्इंना तिची ही केविलवाणी धडपड समजली. त्यांनी तिच्या गावी – बर्धमान येथेच अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी मिळावी यासाठी संबंधित राज्य सरकारकडे शिफारस केली. अपर्णाला नोव्हेंबर २०१० मध्ये शासकीय नोकरी मिळाली. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. ती स्वत:ची आणि आपल्या लहान मुलाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळू लागली.

उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात

पश्चिम बंगालच्या जलपैगुरी जिल्ह्यातील इंडो-भुतान सीमेवर असणाऱ्या एका छोट्या खेडेगावातील वन्य जमातीतील अनिता मुंडाची उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा तार्इंना कळाली. त्यांनी तिला महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी शिफारस केली. पश्चिम बंगाल सरकारकडून तिला सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मिळतील याची व्यवस्था केली.
पश्चिम बंगालच्या बांकुरा गावातील पद्मा रुईदास या मुलीने अल्पवयात लग्न करण्यास नकार दिला. घरच्या गरीबीमुळे तिला चौथीनंतर शिक्षण घेता आले नाही. तार्इंना तिच्यासंबंधीची माहिती कळताच त्यांनी स्थानिक स्वयंसेवी गटाच्या मदतीने तिच्या पुढील शिक्षणाची सोय केली.

स्वप्नाला पूर्ततेची जोड

आर्मेनिया देशाच्या येरेवन या राजधानीत झालेल्या जागतिक ज्युनिअर गटात बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत ताम्रपदक मिळविलेल्या नमित बहादुर या तरुण बॉक्सरची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्याला या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी पुढील प्रशिक्षणाची इच्छा असूनही तो आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेऊ शकत नव्हता. त्याचे हे स्वप्न पुरे झाले पाहिजे यासाठी तार्इंनी विशेष प्रयत्न केले. परिणामी नमितला अनेक संस्थांच्याकडून मदतीचा हात पुढे आला. झारखंड शासनानेही त्याला व्यावसायिक बॉक्सर बनण्यासाठी मदत दिली. नमितच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो भारतीय नौदलात भरती झाला आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतही भाग घेतला.

धडपडणाऱ्यांना मदत

ओरिसा राज्यातील सुंदरगड, संभळपूर आणि मयूरभंज या मागास जिल्ह्यांतील वन्य जमातीतील बाया भनकिडीया हा तरुण रोज १३ किलोमीटरची पायपीट करून शालान्त परीक्षा उतीर्ण झालेला पहिला शिक्षित विद्यार्थी ठरला. तार्इंनी त्याच्या पायपीटीची दखल घेतली. त्याचे पुढील शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्याला मदत मिळेल याची दक्षता घेतली. मयूरभंजच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी त्याला शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन पुढील उच्च शिक्षणासाठी मदत केली.

शेतकऱ्यांला मदतीचा हात

मिर्झापुर येथील जीतनारायण या शेतकऱ्याने आपल्या चार आजारी मुलांच्या बऱ्या न होणाऱ्या आजारपणामुळे आणि उपचारासाठी पैसे नसल्याने मुलांच्या दया-मरणासाठी तार्इंच्याकडे परवानगी मागितली. या चारी मुलांना अनुवंशिक अशा स्नायुंच्या कमकुवतपणाचा आजार होता. त्यामुळे त्यांना कायमचे अंथरुणाला खिळून राहावे लागत होते. त्यांची ही करुण कहाणी ऐकून तार्इंचे मन हेलावले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा देण्यासंबंधी आदेश दिला. आपल्या धडपडीला तार्इंच्या माध्यमातून योग्य आधार मिळाल्याने या कुटुंबाच्या जीवनात या मदतीने जगण्याची उमेद निर्माण झाली.

निवृत्त सैनिकांची गाऱ्हाणी निवारली

परमवीर चक्र पदकाने सन्मानित झालेला बाना सिंग यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न बराच काळ प्रलंबित होता. तार्इंनी त्यांच्या पेन्शनवाठीसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले आणि त्यांचा निवृत्ती वेतनाचा प्रलंबित प्रश्न सुटला.

जवानांना मदत करणाऱ्याची पाठराखण

१९६५ साली इच्छामती नदीच्या भयंकर पुरात अडकलेल्या १५० जवानांची सुटका अतुल हलधर यांनी आपला जीव धोक्यात घालून केली होती. हलधरांनी केलेल्या या कृत्याबद्दल त्यांना शासनाने शौर्यचक्राने सन्मानित केले होते. त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत होती. त्यांना चार मुले होती. पण त्यांनी आपल्या वडिलांची देखभाल करण्याचे नाकारले होते. तशात ते मेंदूज्वराच्या आजाराने अंथरूणाला खिळून होते. उपचारांसाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. त्यांच्या या दुर्दैवी अवस्थेची माहिती तार्इंना समजली. त्यांनी त्याच्या औषधोपचाराचा खर्च दिला. राज्य सरकारला त्याला सरकारी इस्पितळात मोफत औषधोपचार करण्यासाठी निर्देश दिले.

सीमेच्या पलिकडील विचार

पाकिस्थानात राहणाऱ्या सोडा रजपूत जमातीच्या लोकांना भारतातील आपल्या जमातीतील विवाहविेषयक संबंध जोडण्यासाठी भारतात येण्यासाठी आणि राडण्यासाठी केवळ एक महिन्याचाच परवाना मिळत असे. त्यांना मिळणारा हा कालावधी खूप कमी असल्याचे आणि त्याचा मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता तार्इंकडे त्यांनी मांडली ताईंनी गृह खाते आणि परराष्ट्‌-व्यवहार खात्याला याबाबत सकारात्मक विचार करण्यासाठी सूचना दिल्या. राजस्थानमध्ये ही जमात जेसलमेर, बाडमेर, बिकानेर आणि जोधपूर येथे आहे. प्रादेशिक पारपत्र कार्यालय आणि संबंधित जिल्हाधिकारी यांनी आवश्यक ती खातरजमा करून घेऊन तो कालावधी सहा महिन्यापर्यन्त वाढविण्याची तरतूद केली.

रक्षणकर्त्यांना मदतीचा हात

कुलदीप सिंग यानी वेळीच दाखविलेल्या सावधानतेमुळे २००५ च्या दिवाळीच्या अगोदर काही दिवसापूर्वी बॉम्ब-स्फोटापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून दिल्लीकरांचा जीव वाचविला. या स्फोटात त्यांना खूप जखमा झाल्या होत्या. त्यांना औषधोपचाराची तसेच आर्थिक मदतीचीही खूप गरज होती. कुलदीप सिंग यांनी दाखविलेल्या धाडसाचे तार्इंना कौतुक होते. हा आदर्श समाजासमोर प्रकर्षाने आला पाहिजे असे त्यांचे मत होते. कुलदीप सिंग यांना दिल्ली परिवहन महामंडळात वाहन पर्यवेक्षकाची नोकरी मिळाली. शासकीय कोट्यातून त्यांना अग्रक्रमाने घरही मिळाले. स्फोटामुळे आलेल्या कर्णबधिरतेमुळे त्यांना परिवहन मंडळाने उत्तम दर्जाचे कर्णयंत्र दिले; तसेच नुकसानभरपाई म्हणून त्यांना दोन लाख रुपये देण्यात आले.

बुध्दिवंताना सहाय्य

दिल्ली विद्यापीठाच्या भूतपूर्व अधिष्ठाता वयोवृध्द श्रीमती लोतिका सरकार यांना त्या राहत असलेल्या घराच्या मालकीसंबंधात खूप वर्षे वाद सुरू होता. त्यांना घरात राहू दिले जात नव्हते त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासंबंधात प्रसिध्द झालेल्या बातम्या तार्इंच्या नजरेस आल्या. लोतिका सरकार यांना या वयात होणाऱ्या त्रासाबद्दल तार्इंना वाईट वाटले. सरकार यांचा सांभाळ करण्यासाठी जवळचे नातेवाईकही नव्हते. खासदार श्रीमती कपिला वात्स्यायन यांनी सरकार यांच्या काही निकटच्या मित्रासमवेत तार्इंची भेट घेतली. वयोवृध्द लोतिका सरकार यांना त्यांच्या निवासाची अडचण दूर होण्यासाठी तार्इंनी हस्तक्षेप केला. परिणामी सरकार यांना उर्वरित आयुष्य आपल्या घरात सुखाने घालविता आले.

नामांकित कलावंताला मदत

ए के हंगल या नामांकित कलाकाराच्या आजाराची आणि त्यांच्या आर्थिक विवंचणेची बातमी तार्इंना समजली. तार्इंनी त्यांना औषधोपचारासाठी मदत केली. आपली अडचण वेळीच ओळखून तार्इंनी मदत केली याबद्दल हंगल यांनी कृत्तज्ञता व्यक्त केली.

साहसी व्यक्तींना साथ

मंजुमा इक्बाल या स्त्रीने आपला जीव धोक्यात घालून काही मुलांना नदीत बुडण्यापासून वाचविले होते. त्यांच्या या साहसी कृत्याबद्दल त्यांना ‘ उत्तम जीवन रक्षक ’ पदक बहाल करण्यात आले होते . वाराणसी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना समारंभात आवश्यक तो सन्मान मात्र दिला गेला नव्हता. ही बातमी तार्इंच्या वाचनात आली. ताईंनी याची दखल घेऊन शासनाला आवश्यक ते निर्देश दिले. इक्बाल यांना राज्य शासनाकडून समारंभपूर्वक पदक देऊन गौरविण्यात आले.

सामाजिक दुष्प्रवृत्तीविरुध्द आवाज उठविणाऱ्या तरुणीचा सन्मान

बल्टी बागडी या तरुणीने आपल्या विवाह समारंभाच्या वेळेस नियोजित वर हा मद्यपान करून आला आहे, तसेच तो आपल्या वडिलांकडून हुंडा मागत आहे हे लक्षात येताच ती विवाहस्थळातून बाहेर पडली. विवाहाला विरोध केला. तिचा विरोध पाहून वरपक्षाला तेथून पळ काढावा लागला. शेजाऱ्यांनीही तिला पाठिंबा दिला. आदिवासी जमातीतील या गरीब मुलीच्या धाडसाची कहाणी तार्इंना कळाली. तिचे हे धाडसी कृत्य इतर तरुणींच्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास तार्इंनी व्यक्त केला. नंतर राज्य सरकार आणि इतर स्वयंसेवी संस्थाही तिच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे आल्या.

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »