राज्यपालपद

Pratibha Patil - Flight to Governorship
श्रीमती प्रतिभा पाटील यांना राजस्थानमध्ये गार्ड ऑफ ऑनर देतांना

राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल

राजस्थानच्या राज्यपाल म्हणून त्यांनी ८ नोव्हेंबर २००४ रोजी सुत्रे स्वीकारली. त्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांना बहुमान मिळाला. त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती वसुंधराराजे होत्या. त्यांचे त्यांच्याशी संबंध चांगले होते त्यामुळे त्यांच्या कामकाजात कुठल्याही प्रकारची बाधा आली नाही. ताईंनी आपले काम राज्याच्या हितासाठी अत्यंत दक्षतेने आणि निःपक्षपातीपणे सांभाळले. आपल्या कामकाजाच्या पद्धतीने त्यांनी सर्वांना असे दाखवून दिले की, नीतितत्वानुसार आणि वस्तुनिष्ठपणे काम केले तर ते सर्वांच्या हिताचे आणि परिणामकारक होते.

राज्यपालपदी असताना त्यांच्या कामाचे स्वरुप वैविध्यपूर्ण असे होते. राज्याच्या त्या घटनात्मक प्रमुख तर होत्याच, त्याचबरोबर त्या राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतीपदी होत्या तसेच त्या पश्चिम विभागीय सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षाही होत्या. त्यांनी आपल्याला दिलेल्या या सर्व जबाबदा-या महत्वाच्या मानून प्रत्येक विभागाच्या कामकाजाला यथोचित न्याय दिला.

आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक जबाबदा-या समर्थपणे सांभाळल्या. चंद्रावरच्या मोहिमेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब आले होते त्यावेळी ताईंनीही वक्ते म्हणून आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्लॅस्टिक सर्जन परिषदेला संबोधित केले. त्याचबरोबर ‘आवो गाँव चले’ या राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य प्रकल्पाचे स्वागत केले. ‘स्त्री भ्रूण हत्या’ विरोधी झालेल्या मेळाव्यात यथोचित उद्बोधन केले.

ग्रामीण आरोग्यसेवा पुढाकार

एकदा ताई महाराष्ट्रात आरोग्यमंत्री असतांना त्यावेळी जेजे हॉस्पिटल मधील सर्जन डॉ. आंटीया हे जयपूरला आले असता ताईंना भेटावयास आले त्यांनी ते पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात ग्रामीण लोकांना करिता राबवित असलेल्या परिंचे गांव येथील प्रोजेक्ट ची माहिती दिली. त्यांनी ती लक्ष देऊन एकूण ती प्रत्यक्ष पहाण्याची ईच्छा व्यक्त केली व तसे त्या परिंचे येथे समक्ष जावून पाहून आल्या. त्यांनी तसा प्रोजेक्ट राजस्थान साठी सुरु करण्यास त्यांचा सहयोग मागितला व नंतर ग्रामीण भागात आरोग्याचे महिलांचे लहान बालकांचे व इतरांचे ही प्रश्न सुटावेत त्यांना गावातच शक्य तोंवर ईलाज उपलब्ध व्हावा या साठी तो जातीने रस घेऊन राजस्थानमध्ये सुरु केला. राजस्थानमध्ये उदयपूर डिव्हिजन मध्ये आदिवासीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण शासनाच्या नोकर भरतीच्या वेळी त्यांचा कोटा पूर्ण होत नाही हे ताईंच्या निदर्शनास आले कारण तितके शिकलेले उमेदवार मिळत नाहीत, शिकलेले उमेदवार मिळावे म्हणून त्यांनी सरकारला सांगून या डिव्हिजन मध्ये एक आदिवासी मुलांसाठी व एक मुलींसाठी पब्लिक स्कूलच्या धर्तीवर शाळा सुरु करावयास लावल्या. आज त्यात अनेक आदिवासी मुल मुली चांगलं शिक्षण घेवून बाहेर पडत आहेत.

विधवांना मदत

तार्इंचे सर्वात महत्त्वाचे योगदान हे त्यांनी सैनिकांच्या विधवांसाठी केलेले काम होय. राजस्थानच्या विविध जिल्ह्यांत राहणाऱ्या १,२०० सैनिकांच्या विधवांना त्यांनी व्यक्तिगत पत्रे लिहिली. त्यांना काही अडचणी आहेत का? याची माहिती विचारली. ज्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणींबाबत गाऱ्हाणी कळविली, त्यांना त्या समक्ष भेटल्या. त्यांचे दु:ख ऐकून घेतले आणि संबंधित सरकारी खात्यांना त्या त्वरित निवारण करण्यास फर्माविले. त्यांनी त्या अडचणींचे निवारण होत आहे किंवा कसे यासाठी पिच्छा पुरविला आणि त्यांच्याकडे आलेल्या जवळजवळ ४०० तक्रारींचे निवारण केले. त्यांच्या पुनर्वसनासाठी जयपूर येथे वसतीगृह हेाते पण कार्यरत नव्हते. ते वसतीगृह पुन्हा सुरू केले. सैनिकांच्या विधवांना दिलासा मिळावा आणि कसल्याही अडी-अडचणीच्या वेळेस त्वरित मदत मिळावी हा त्यांचा हेतू होता. विधवाना येणाऱ्या अडचणींची त्यांना माहिती मिळत होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने उचित पाऊले उचलली. परित्यक्ता स्त्रिया, विशेषकरून विधवांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे यासाठी ताई सदैव दक्ष राहिल्या. त्यांनी ‘महिला स्वयंसिध्द केंद्र’ स्थापन करून त्या केंद्राद्वारे महिलांना निवारा, शिक्षण आणि उपजीविकेसाठी स्वयंरोजगाराचे शिक्षण दिले जाईल अशी योजना आखली. त्यामुळे या महिला स्वत:चे अर्थार्जन करून समाजात ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगू शकतील अशी त्यांची खात्री होती. तार्इंनी या केंद्रांसाठी ५० एकर जमीन राखून ठेवण्याचा आदेश दिला.

विद्यापीठातील शिक्षण

‘अज्ञान निवारण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय’ असे ताईंचे मत होते. त्यामुळे ज्ञानदानाचे उदात्त काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यात अडचणी निर्माण होईल अशा कुठल्याही कृतीविरुध्द त्यांनी आवाज उठविला. विद्यापीठातून निर्माण होणाऱ्या संशोधनात्मक प्रबंधामधून त्यांनी खालावत चाललेली गुणवत्ता आणि दुसऱ्याचे संशोधन आपले म्हणून खपविणे असे अनेक प्रकार (plagiarism) नजरेस आल्यानंतर पुनः तसे गैरप्रकार होऊ नये म्हणून ताईंनी सर्व कुलगुरूंना विद्यापीठात नोंदणी झालेल्या संशोधन प्रकल्पाचे नाव आणि त्याबाबतचा सारांश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या मौलिक सूचनेचे सर्व स्तरांवर स्वागत झाले. राजस्थान विद्यापीठांत ‘उच्च शिक्षणः सिहावलोकन आणि भवितव्य’ या विषयांवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन त्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उच्च शिक्षणातील प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यकाळात खासगीकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रियेमुळे होणाऱ्या बदलामध्ये आपल्या विद्यापीठांना अधिक चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण योजना आखता येण्यासाठी सक्षम बनविणे हा या परिषदेचा उद्देश होता.

राष्ट्रपती

भारताच्या सर्वोच्य घटनात्मक पदावर जाण्यासाठी जेव्हा त्यांनी जून २००७ मध्ये राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राज्यपालपदी असतांना त्यांचे आपल्या कर्मचाऱ्याशी सौहार्दाचे संबंध असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे ते कर्मचारी उदास झाले होते त्याचबरोबर आपल्या राज्यपाल या निकटच्या काळात राष्ट्रपति होणार याचा आनंदही त्यांच्या मनात होता. त्यांच्या असामान्य कार्यकुशलतेचा आणि कुठलाही बडेजाव न दाखविता सर्वांशी असलेल्या स्नेहपूर्ण वर्तणूकीचा प्रत्यय जनतेला आला.

२००७ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली ताईंना ६,३८,११६ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ३,३१,३०६ मते मिळाली. भारताच्या त्या १२ व्या राष्ट्रपति बनल्या. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या या भाषणात संत तुकाराम महाराजांच्या ‘जे कां रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेचि जाणावा साधू तोचि ओळखावा’ या मानवाला दिलेल्या संदेशाची व देश चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या या उक्तीची सर्वांना आठवण करून दिली. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि भारतीय सैन्यदलाच्या प्रमुख बनल्या.

श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास

National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »